नमस्कार मित्रानो आज मी तुम्हाला माझ्या आवडीच्या काही छान पाक कृती सांगणार आहे .त्या नक्की करून बघा आणि त्यांचा आनंद घ्या . मला वैयक्तिक त्या खूप आवडतात.

कॉर्न बिर्याणी

साहित्य : दोन वाट्या तांदूळ, एक इंच दालचिनी, तीन लवंगा, दोन विलायची, तेल चवीनुसार, मीठ, दोन वाट्या वाफवलेले मक्याचे दाणे, दोन बारीक चिरलेले कांदे, दोन बारीक चिरलेले टोमॅटो, दोन चमचे आलं - लसूण पेस्ट, हिरवी मिरची आवडीनुसार, एक चमचा गरम मसाला, एक चमचा जिरे पूड, एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे कोथिंबीर व मीठ चवीनुसार

कृती : कढईत तेल तापवून घ्या त्यानंतर दालचिनी, लवंग, विलायची, मीठ घालून परतून घ्या. त्या चार वाट्या पाणी घालून भिजवलेला दोन वाट्या तांदूळ घालून मोकळा भात शिजवून घ्या. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा घालून तांबूस होईपर्यंत परतून घ्यावे नंतर आलं-लसूण पेस्ट, मिरच्या, गरम मसाला, जिरे पूड घालून परतून घ्या. छान सुगंध आला, की त्यात वाफवलेले मक्याचे दाणे, टोमॅटो, लिंबाचा रस व मीठ चवीनुसार घालून शिजवून घ्यावे. शिजलेल्या सारणात वरील शिजलेला मोकळा भातघालून एकत्रित वाफवून घेतला, की कॉर्न बिर्याणी खाण्यासाठी तयार!
 घ्या आता मनसोक्त आनंद ......

कॉर्न बिर्याणीसाठी टिप्स:

  • तांदूळ: बिर्याणीसाठी नेहमी 'बासमती' किंवा 'लॉन्ग ग्रेन' तांदूळ वापरावा आणि तो शिजवण्यापूर्वी किमान २०-३० मिनिटे भिजत ठेवावा, यामुळे भात मोकळा आणि लांब सडक होतो.

  • कॅलरी कमी करण्यासाठी: जर तुम्हाला अधिक हेल्दी करायचे असेल, तर तेलाऐवजी थोडे तूप वापरा, यामुळे बिर्याणीला उत्तम सुगंध येतो.

छान छान खाद्य पदार्थ |tasty food making
छान छान खाद्य पदार्थ |tasty food making


नवधान्याचा ढोकळा

साहित्य : एक वाटी उडीद डाळ, दोन वाटी तांदूळ, एक वाटी ज्वारी, अर्धा वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी तूरडाळ, अर्धी वाटी पांढरे वाटाणे, अर्धी वाटी चवळी, दोन वाटी आंबट दही, हिंगपाव चमचा, अर्धा चमचा लिंबू सत्तव, एक टीस्पून खायचा सोडा, आलं- लसूण - हिरव्या मिरचीचे वाटण, दोन टीस्पून चवीनुसार साखर आणि मीठ
-
कृती : सर्व धान्ये सहा - सात तास पाण्यात भिजत घालावी (वेगवेगळी), नंतर पाण्यातून उपसून वेगवेगळीच मिक्सरमधून वाटून घ्यावी. नंतर सर्व धान्यांची पीठे एकत्र कालवून ठेवावी. आठ-दहा तासानंतर त्यात दही, मीठ, हिंग, लिंबू, सत्त्व, आलं-लसूण-मिरची पेस्ट, खायचा सोडा आणि साखर घालून मिश्रण हलक्या हाताने कालवावे. ढोकळा पात्रात किंवा शिट्टी काढलेल्या कुकरमध्ये तेल लावलेल्या भांड्यात ठेवून हे मिश्रण १५-२० मिनिटे वाफवावे. वरून मोहरीची फोडणी करून त्यावर टाकावी. शेवटी त्यावर खोवलेले नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर पसरावी.
घ्या आता मनसोक्त आनंद ......

नवधान्य ढोकळ्यासाठी टिप्स:

  • आंबवणे (Fermentation): पीठ व्यवस्थित फुगण्यासाठी ते उबदार ठिकाणी ठेवावे. हिवाळा असल्यास पीठ आंबायला जास्त वेळ लागू शकतो.

  • मऊपणा: ढोकळा अधिक मऊ (Spongy) हवा असेल, तर पिठामध्ये एक चमचा तेल घालावे, यामुळे ढोकळा घशात कोरडा लागत नाही.

हैदराबादी बगारे बैंगन

साहित्य : छोटी वांगी पाव किलो, उभा चिरलेला कांदा, एक वाटी आले - लसूण - मिरची पेस्ट दोन टीस्पून, चिंचेचा कोळ तीन टीस्पून, एक टेबल स्पून धने, दोन टेबल स्पून तीळ, एक टेबल स्पून शेंगदाणे, जिरे एक टीस्पून, खसखस दोन टीस्पून, दोन लवंगा, दोन विलायची, शहाजिरे अर्धा टीस्पून, दालचिनी एक इंच, दोन टेबल स्पून तेल, मोहरी अर्धा टीस्पून, हिंग पाव टीस्पून, अर्धा टीस्पून मेथी दाणे चवीनुसार मीठ, हळद अर्धा टीस्पून.

कृती : वांगी भरल्या भाजीसाठी चिरून मीठ घातलेल्या पाण्यात अर्धा तास ठेवावी. कांदा तेलावर परतून घ्यावा. धने, जिरे, तीळ, शेंगदाणे, खसखस, शहाजिरे, दालचिनी, लवंगा, विलायची, सर्व वेगवेगळे कोरडे भाजून पूड करावी. वांगी निथळून घ्यावी. कांदा वाटून घ्यावा. कढईत जरा जास्त तेल घालून वांगी चांगली परतून घ्यावीत. चांगली वाफली, की सर्व मसाला घालावा. परतून थोडे पाणी घालून भाजी शिजवावी. चिंचेचा कोळ शेवटी घालून, मीठ घालून गॅस करावा. आंबट,तिखट, तेलकट चविष्ट अशी पारंपरिक भाजी खूप छान लागते.
घ्या आता मनसोक्त आनंद ......

हैदराबादी बगारे बैंगनसाठी टिप्स:

  • कडू चव टाळण्यासाठी: वांगी चिरल्यानंतर ती मिठाच्या पाण्यात ठेवावीत, यामुळे वांग्यातील कडूपणा निघून जातो आणि ती काळी पडत नाहीत.

  • मसाल्याचा पोत: शेंगदाणे, तीळ आणि खसखस वाटताना थोडे पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करावी, ज्यामुळे ग्रेव्हीला छान हॉटेलसारखा 'टेक्सचर' येतो.


नागपुरी वडा-भात

साहित्य : चार वाट्या तांदूळ, वाटी उडीद डाळ, एक वाटी हरभरा डाळ, एक वाटी मूग डाळ, दाणे, एक चमचा धने-जिरे पावडर, कढीपत्ता, चवीनुसार तिखट, तेल, मोहरी, हिंग, चवीनुसार मीठ

कृती : सर्व डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्यात. भिजल्यानंतर चाळणीत ठेवून निथळून घ्यावे. त्यात
मेथी दाणे घालून सर्व डाळी जाडसर वाटून घ्याव्यात. वाटलेल्या डाळीत थोडा कढीपत्ता, तिखट,
धने-जिरे पूड, अर्धे छोटी वाटी कडकडीत तेल, चवीनुसार मीठ घालून गरजेनुसार पाणी घालून मिश्रण
सैलसर भिजवावे. त्या मिश्रणाचे चपट्या आकाराचे वडे करून मंद आचेवर तेलात तळून घ्यावे. चार
वाटी तांदळाचा मोकळा फडफडीत भात करून घ्यावा. हा भात परातीत घेऊन एकसारखा परतावा. त्यावर
वडे तुकडे करून घालावे. वरून गरम तेलात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता यांची खमंग फोडणी घालावी. आपला
नागपुरी वडाभात खाण्यासाठी तयार आहे.
घ्या आता मनसोक्त आनंद ......

 नागपुरी वडा-भातसाठी टिप्स:

  • कुरकुरीत वडे: वड्यांसाठी डाळी वाटताना त्या खूप बारीक वाटू नका, थोड्या जाडसर (दरदरीत) ठेवल्यास वडे छान कुरकुरीत होतात.

  • फोडणी: भातावर फोडणी घालताना ती एकदम कडकडीत असावी, जेणेकरून त्याचा सुगंध संपूर्ण भातात पसरेल.


अमेरिकेचे स्पायसी लसानिया (अमेरिकन स्पायसी पनीर लसानिया)

साहित्य : एक टेबलस्पून लोणी, २५० ग्रॅम पनीर, एक मोठा कांदा, एक टीस्पून बेसन, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, १ टोमॅटो, तीन-चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, तिखट, मिरपूड, मेथीदाणे, प्रत्येकी अर्धा टीस्पून, मीठ चवीनुसार

कृती : प्रथम पनीरचे चौकोनी तुकडे करावे. बेसन पिठात थोडे पाणी घालून ते पातळसर करावे. त्यात प्रत्येक पनीरचा तुकडा बुडवून तो एका पसरट थाळीत ठेवावा. सर्व पनीरचे तुकडे बेसन पिठात बुडवून थाळीत ठेवून थाळी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी. कांदा टोमॅटो चिरून घ्यावा. पॅनमध्ये लोणी गरम करून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, तिखट, मिरपूड, मेथीदाणे व चवीनुसार मीठ टाकावे. आता पनीरचे तुकडे फ्रीजमधून बाहेर काढावे व ते हाताने थोडे कुस्करून घ्यावे. हे कुस्करलेले पनीर पॅनमधील मसाल्यात टाकावे. मंद आचेवर परतताना कडेने लोणी सुटलेले दिसले, की आपले अमेरिकन स्पायसी लसायनिया तयार झाले. वरून कोथिंबीर पेरून ब्रेड व चपातीबरोबर सर्व्ह करावे.
घ्या आता मनसोक्त आनंद ......
अमेरिकन पनीर लसानियासाठी टिप्स  
  1. फ्रीजिंग: पनीरचे तुकडे बेसन लावून फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते तळताना किंवा परतताना आकार सोडत नाहीत आणि वरचे कोटिंग क्रिस्पी राहते. 
  2. बदलासाठी: तुम्ही पनीरसोबत बारीक चिरलेली सिमला मिरची किंवा स्वीट कॉर्न देखील वापरू शकता, यामुळे चव अधिक वाढेल.
निष्कर्ष - प्रिय वाचक मित्रानो हे पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा ,, आणि ते बनवताना काय गंमत झाली तेही सांगा ....

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने