परीक्षेचे टेन्शन विसरा! अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी ५ प्रभावी पायऱ्या
आपण सगळ्यांनी असा अनुभव घेतला असेलच की ,परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण होते.
"इतका मोठा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार ?"असा प्रश्न बऱ्याचदा सरळ परीक्षेच्या दिवसांमध्येच अभ्यासण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पडतो. पण मित्रांनो, अभ्यास 'जास्त' करण्यापेक्षा तो 'नियोजनाने' (Smart Work) केला, तर यश नक्की मिळते.
आजच्या या लेखात आपण अभ्यासाचे नियोजन (Study Planning) कसे करावे, याच्या काही सोप्या आणि प्रॅक्टिकल टिप्स पाहणार आहोत.
१. योग्य वेळापत्रक बनवा (Create a Realistic Timetable)
वेळापत्रक बनवताना आपण अनेकदा चूक करतो ती म्हणजे, आपण एकाच दिवसात १०-१० तास अभ्यासाचे नियोजन करतो, जे पाळणे अशक्य होते. जर दिवसभरात दहा तास करणे तुम्हाला शक्य झाले असते तर परीक्षेच्या वेळी एवढी धावपळ उडाली असती का? याचा विचार करून योग्य असे वेळापत्रक बनवा. वेळापत्रक बनवताना खालील बाबींचा विचार करा.
नियम: तुमच्या झोपण्याच्या, जेवण्याच्या आणि विश्रांतीच्या वेळा सोडून उरलेला वेळ अभ्यासासाठी वापरा. झोप आणि जेवण व्यवस्थित असेल तर अभ्यास चांगला होतो हे विसरू नका.
बदल: दररोज एकाच विषयाचा कंटाळा येऊ नये म्हणून दिवसातून किमान दोन वेगवेगळे विषय अभ्यासाला घ्या. वेगवेगळे विषय घेतल्याने अभ्यासामध्ये एकाग्रता राहण्यास मदत होते.
२. सर्व विषयांची विभागणी करा (Categorize Your Subjects)
सर्व विषय सारखे नसतात. काही सोपे असतात, तर काही कठीण. तुम्हाला कोणते विषय कठीण वाटतात आणि सोपे वाटतात हे तुमच्यापेक्षा जास्त कोणीही सांगू शकणार नाही.
कठीण विषय: गणित किंवा विज्ञान यांसारखे कठीण वाटणारे विषय सकाळी अभ्यासाला घ्या, कारण सकाळी आपले मन ताजेतवाने असते. या वेळेत एकाग्रता चांगली होते.
सोपे विषय: भाषा (मराठी, इंग्रजी) किंवा इतिहास यांसारखे विषय दुपारच्या वेळी वाचा, जेव्हा आपल्याला थोडी सुस्ती येते. पाच दहा मिनिटांचा ब्रेक घेतला तरीही काही अडचण नाही.
३. 'पोमोडोरो' तंत्राचा वापर करा (The Pomodoro Technique)
मी हे तंत्र आहे तरी काय हे प्रथम तुम्हाला समजावून सांगतो .सतत दोन-तीन तास एका जागी बसून अभ्यास केल्याने मेंदू थकतो आणि लक्षात राहण्याचे प्रमाण कमी होते. म्हणजे कष्ट तर जास्त होतात परंतु अभ्यास कमी होतो.
पद्धत: २५ ते ३० मिनिटे मन लावून अभ्यास करा आणि त्यानंतर ५ मिनिटांचा 'शॉर्ट ब्रेक' घ्या. यालाच 'पोमोडोरो' तंत्र (Pomodoro Technique) म्हणतात. यामुळे तुमची एकाग्रता (Concentration) वाढते. व अभ्यास करायला कंटाळा येत नाही. हा माझा स्वतःचा देखील अनुभव आहे.
४. स्वतःच्या नोट्स तयार करा (Handwritten Notes)
हा माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.केवळ पुस्तक वाचल्याने अभ्यास पूर्ण होत नाही. वाचताना महत्त्वाचे मुद्दे एका वहीत लिहून काढा.
स्वतःच्या हाताने लिहिलेल्या नोट्स परीक्षेच्या आदल्या दिवशी 'रिव्हिजन' (Revision) करण्यासाठी खूप उपयोगी पडतात.
मोठे मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी 'माइंड मॅप्स' (Mind Maps) किंवा चित्रांचा वापर करा.
माइंड मॅप्स' (Mind Maps) माईंड मॅप कसा बनवायचा हे तुम्हाला माहित नसेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की सांगेन की माईंड मॅप कसा बनवायचा ?
त्याबरोबरच वन पेज नोट देखील बनवू शकता त्यामुळे संपूर्ण सिल्याबस अगदी एका कागदावर सुद्धा लिहून अभ्यास चांगल्या पद्धतीने करता येतो.
५. रिव्हिजन: अभ्यासाचा कणा
तुम्ही आज जे वाचले आहे, ते जर आठवडाभर पुन्हा पाहिले नाही, तर आपला मेंदू त्यातील ७०% भाग विसरून जातो. रिविजन हा अभ्यासाचा आत्मा आहे हे लक्षात ठेवा.
नियम: दिवसाच्या शेवटी अर्धा तास 'आज काय वाचले' याची उजळणी करा. यालाच आपण सिंहावलोकन असे देखील म्हणू शकतो.
तसेच, आठवड्यातून एक दिवस (उदा. रविवार) फक्त रिव्हिजनसाठी राखून ठेवा. हा वार तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवा असे माझे मत आहे.
निष्कर्ष:
अभ्यासाचे नियोजन म्हणजे स्वतःला शिस्त लावणे होय. सुरुवातीला वेळापत्रक पाळणे थोडे कठीण जाईल, पण एकदा सवय झाली की तुम्हाला अभ्यासाचा ताण येणार नाही. एकदा का तुम्ही नियोजनावर ठाम राहिला की तुमचे मन देखील इतरत्र जाण्याची हिंमत करत नाही. लक्षात ठेवा, "नियोजन न करणे, म्हणजे अपयशाचे नियोजन करणे होय."
त्यामुळे आजच तुमची वही-पेन घ्या आणि स्वतःचे अभ्यासाचे नियोजन तयार करा!
प्रिय मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला आणि या लेखाचा अभ्यासात तुम्हाला उपयोग झाला किंवा नाही हे देखील मला कळवा.
हे देखील वाचा -
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.