माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल निबंध |माझ्या स्वप्नातील भारत निबंध
माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल निबंध |माझ्या स्वप्नातील भारत निबंध


माझ्या स्वप्नातील भारत

                 भारत हा केवळ एक भूभाग नसून तो एक जिवंत राष्ट्रपुरुष आहे ज्याची  एक महान संस्कृती आणि परंपरा आहे. प्रत्येक भारतीयाप्रमाणेच माझ्याही मनात माझ्या देशाबद्दल काही स्वप्ने आहेत. 'माझ्या स्वप्नातील भारत' हा केवळ तंत्रज्ञानाने प्रगत असलेला देश नसेल, तर तो अनेक समृद्ध मूल्यांनी बहरलेला  देश असेल.
     माझ्या स्वप्नातील भारतात असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'शिक्षण आणि समानता'. आज आपल्याकडे पदव्या खूप आहेत, पण खरा सुशिक्षित समाज घडणे अजूनही बाकी आहे. माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येक मुलाला, मग तो श्रीमंत असो वा गरीब, उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल. जिथे जात-पात, धर्म आणि लिंग यावरून भेदभाव केला जाणार नाही, असा एक एकसंध समाज मला पाहायचा आहे. समता आणि समानता याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझा भारत देश असेल.
      दुसरे महत्त्वाचे स्वप्न म्हणजे 'शेतकरी आणि ग्रामीण विकास'. भारत हा खेड्यांचा देश आहे असे म्हटले जाते. माझ्या स्वप्नातील भारतात शेतकरी हा केवळ 'अन्नदाता' न राहता तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल आणि खऱ्या अर्थाने तो जगाचा पोशिंदा शोभेल. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  मिळून  गावे स्वयंपूर्ण होतील, जेणेकरून तरुणांना रोजगारासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. यामुळे शहरांमधली गर्दी ही वाढणार नाही व स्वयंपूर्ण खेडे तयार होतील.
      माझ्या स्वप्नातील भारत हा 'स्वच्छ आणि निसर्गरम्य' असेल. जिथे नद्या प्रदूषणमुक्त खऱ्या जीवनदायीनी असतील आणि शहरांमध्ये सिमेंटच्या जंगलांऐवजी हिरवीगार झाडे असतील. पर्यावरणाचे रक्षण करणे आणि त्याचा समतोल साधने ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असेल. विज्ञानाच्या प्रगतीसोबतच जिथे आपल्या प्राचीन संतांची शिकवण, म्हणजे 'माणुसकी', जपली जाईल.
मग आपण सहज म्हणू शकू की ,
  "मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते 
तेनेचि पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही"
     शेवटी, माझा स्वप्नातील भारत असा असेल जिथे प्रत्येक स्त्री सुरक्षित असेल आणि तिला तिची स्वप्ने पूर्ण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. स्त्रियांकडे आदर युक्त आणि पवित्र भावनेने पाहिले जाईल. जिथे भ्रष्टाचार नसेल आणि न्याय सर्वांसाठी समान असेल. जेव्हा आपण सर्वजण केवळ स्वार्थाचा विचार न करता 'देश प्रथम' हा विचार करू, तेव्हाच माझ्या स्वप्नातील हा 'सुजलाम् सुफलाम्' भारत प्रत्यक्षात आकारास येईल.

              मी आशा करतो की ,तुम्हाला हा माझ्या स्वप्नातील भारत  निबंध आवडला असेल आणि याचा नक्कीच तुमच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनामध्ये उपयोग होईल. तुम्हाला या प्रकारचेच अजून निबंध किंवा कल्पनाविस्तार हवे असतील तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही ते नक्की लिहिण्याचा प्रयत्न करू.
 #MyDreamIndia #NewPost #MarathiBlog #MarathiBlog #India2047 #SanatanSanskriti #MarathiNibandh

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने